धुळे - जिल्हा बालकल्याण समिती आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रयत्नाने तसेच दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने धुळ्यातील बालगृहात राहणाऱ्या मुली संगणकाचे प्रशिक्षण घेत आहेत. हा उपक्रम धुळ्यात पहिल्यांदा होत असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
धुळ्यातील एका बालगृहात राहणाऱ्या निराधार, अनाथ असलेल्या मुलींमध्ये आपण स्वावलंबी व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी उमेद निर्माण झाली. या मुलींनी आपली अपेक्षा जिल्हा बालकल्याण समितीकडे व्यक्त केली. यानंतर धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला. यानंतर शहरातील काही दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने या मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. शहरातील बोस्टन कॉम्प्युटर याठिकाणी बालगृहातील १४ मुलींना मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाची संकल्पना महिला बालकल्याण समितीच्या सदस्या प्रा. वैशाली पाटील यांनी सर्वप्रथम मांडली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या मुलींना मोफत प्रशिक्षण मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बोस्टन कॉम्प्युटरचे संचालक विष्णुकांत फाफट यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेत या मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी तयारी दर्शवली. महिला बालकल्याण समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि बोस्टन कम्प्युटर यांच्या त्रिवेणी संगमातून या मुली संगणक प्रशिक्षण घेत आहेत. धुळे शहरात हा उपक्रम पहिल्यांदा होत असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.