धुळे - भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा मुंबई येथे पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक राजकारणातील कुरघोडीना कंटाळून आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धुळे शहराचे भाजपचे आमदार गोटे यांनी सोमवारी आपल्या भाजप सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा सादर केला. ते धुळे लोकसभा मतदार संघातून अपक्ष लढणार आहेत. यासाठी ते मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
धुळे महापालिका निवडणुकीपासून गोटेंचे आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले होते. महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले होते. यामुळे त्यांच्यात आणि डॉ. सुभाष भामरे तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले होते. त्यांनी महाजनांवर आरोप केले असून पक्षातील कुरघोडीना कंटाळून आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.