चंद्रपूर - संचारबंदीत हाताला काम नसल्याने मजूर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे सरकारने रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात केली आहे. मोठ्या संख्येने मजूर कामावर जात आहेत. राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देत मजुरांशी संवाद साधला. थेट आमदारच कामावर आल्याने अधिकाऱ्यांची मात्र धावपळ झाली.
राजुरा तालुक्यातील चिंचोली ( बु ), कवीठपेठ, नलफडी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील नाला खोलीकरणाचे काम सूरू आहे. कामावर मोठ्या संख्येने मजूर आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सींगचा वापर कामावर सुरू आहे.
कामाचा आढावा घेण्यासाठी राजुऱ्याचे आमदार धोटे यांनी थेट कामाचे ठिकाण गाठत कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मजुरांशी संवाद साधला. त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या सुरक्षितेविषयी आस्थेने विचारपूस केली. आमदार आल्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली.