चंद्रपूर गणेशोत्सव झाल्यावर लगेच संपूर्ण राज्यात दुर्गादेवीचा उत्सव (Festival of Goddess Durga) साजरा केला जाणार आहे. यासाठी दुर्गादेवीची विशाल मूर्ती साकारली जाते. मात्र, चंद्रपुरात राज्यातील सर्वात मोठी दुर्गादेवीची (largest idol of Goddess Durga in maharashtra) मूर्ती आहे. एकाच दगडावर एवढी मोठी मूर्ती असणारे हे राज्यातील एकमेव शिल्प आहे. 16 व्या शतकात रायप्पा वैश्य यांच्या पुढाकाराने येथे मूर्ती साकार करण्यात आली आहे. जी 18 फूट रुंद आणि 23 फूट उंच अशी आहे.
आणि मंदिराचे काम अपूर्णच राहिले... 16 व्या शतकात चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजाचे साम्राज्य होते. राजा धुंड्या रामशाहा यांच्या कार्यकाळात रायप्पा वैश्य हे धनिक असून ते शिवभक्त होते. त्यांनी राज्यात भव्य शिवमंदिर बांधण्याचा संकल्प केला. राज्यातील उत्तम शिल्पकारांकडून मंदिरासाठी सुंदर मूर्ती आकारास येऊ लागल्या. दशमुखी दुर्गा, महिषासुरमर्दीनी, मत्स्यावतार, कूमवितार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, शेषनाग व गरुड अशा अनेक सुंदर मूर्तीचे काम पूर्णत्वास गेले; पण रायप्पांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील कुणीही या कार्यात रस घेतला नाही आणि काम आहे त्या स्थितीत बंद झाले. कारागिरांकडून तयार केलेल्या विविध देवतांच्या मूर्ती येथे संरक्षित आहेत. या देवतांच्या भव्यमूर्ती आज शहरातील भिवापूर वॉर्डातील आकाशाच्या मांडवाखाली आज पडल्या आहेत.
ही आहे मूर्तीची खासियत भिवापूर परिसरात या मुर्त्या अजूनही पडलेल्या अवस्थेत आहेत. एकाच दगडावर कोरलेल्या ह्या विशाल मुर्त्या आहेत. त्यात दुर्गादेवी यांची दशमुखी मूर्ती साकार करण्यात आली आहे. अत्यंत विशाल अशी मुर्ती असून 18 फूट रुंद आणि 23 फूट उंच अशी आहे. राज्यात दुर्गादेवीची विशाल मूर्ती कुठेही नाही असे इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर सांगतात.
मूर्त्यांचे जतन व्हायला हवे -अशोकसिंग ठाकूर
दगडावर कोरलेल्या देवीदेवतांची मुर्त्या ह्या शिल्पकलेचा (Sculpture) उत्तम नमुना आहे. मात्र त्या आता बेवारस पडून असल्याने नष्ट होण्याची भीती आहे. हे उत्तम शिल्प जतन करण्यासाठी शासन-प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवी अशी प्रतिक्रिया इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.