चंद्रपूर - आदिवासी वसतीगृहातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर ज्या गंभीरतेने प्रशासनाने पावले उचलायला हवी होती, तशी कारवाई झाली नाही. तसेच या प्रकरणात दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राजुरा येथील इन्फॅन्ट जिझस कॉन्व्हेंट आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्याची बाब समोर आली. आज याच विषयावर काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आहेत. अत्याचार कुठेही घडला, तरी तो निषेधार्हच आहे. हे प्रकरण तर त्याहून गंभीर आहे. एकाच वेळी तब्बल 13 मुलींना गुंगीचे औषध दिले जाते. त्यापैकी दोघींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर येते. मात्र, यानंतरही प्रशासन खडबडून जागे होत नाही. काही वसतीगृहातील अधिकारी सहभागी आहेत, ही बाब पूर्णपणे खरी नाही. यात आणखी बरेच लोक सामील आहेत. त्याशिवाय असे प्रकरण होणे शक्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या हाती हे प्रकरण द्यावे आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पुगलिया यांनी यावेळी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.