चंद्रपूर : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे हे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांनी शिकविण्यासाठी आपल्या जागी दुसऱ्या शिक्षकाला तात्पुरत्या स्वरूपात हे काम दिले आहे. शासनाचा पगार ते उचलतात, मात्र काम ते भाजपचे करतात. शाळेत कधीच हजर राहत नाहीत. यासाठी शाळेचे व्यवस्थापन देखील मदत करते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. बोढे यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
भाजपचे पदाधिकारी : विवेक बोढे हे घुगूस येथील भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हे पद देण्यात आले आहे. ते घुगूस येथील चांदा शिक्षण प्रसारण मंडळाच्या जनता शाळेत शिक्षक म्हणून रुजू आहेत. मात्र, ते शाळेत येतच नाहीत, याऐवजी त्यांनी चक्क एका शिक्षकाला कामावर ठेवले आहे. त्याला प्रती महिना 15 हजार रुपयांप्रमाणे बोढे हे मानधन देतात. बोढे यांचा विषय हा शिक्षक शिकवतो, असा त्यांच्यावर आरोप आहे.
शाळेत गेल्यावर सत्य उघड : याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर काँगेसचे पदाधिकारी जनता शाळेत भेट द्यायला गेले. यावेळी शुभम अशोक कोयाडवार हा नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत होता. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पाहून त्याने शाळेतून पळ काढला. याबाबत मुख्याध्यापिका यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शुभम हा संगणक शिकवीत असल्याचे सांगितले. मात्र शाळेत एकही संगणक आढळला नाही. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक विवेक बोढे यांच्याबाबत विचारणा करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपण या नावाच्या शिक्षकाला ओळखत नाही असे सांगितले, त्यांचा फोटो दाखवून देखील विद्यार्थ्यांनी बोढे हे आपले शिक्षक नसल्याचे स्पष्ट केले. शुभम कोयाडवार हेच आमचे शिक्षक असल्याचे सांगितले, तर दुसरीकडे शाळेकडून शुभम हे शिक्षक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी विचारणा केली शाळेकडून बोडे हे किरकोळ रजेवर आहे, असे सांगण्यात आले. मात्र हजेरीपटावर ते अनुपस्थित असल्याचे नमूद होते, असे काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामध्ये मुख्याध्यापिकेसह चांदा शिक्षण प्रसार मंडळाचे जबाबदार पदाधिकारी देखील सामील आहेत. त्यांच्या वरदहस्तामुळे बोडे हे शाळेत न राबता भारतीय जनता पार्टीसाठी काम करीत आहेत, असा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र -विवेक बोढे : संपूर्ण सखोल चौकशी करून आठ दिवसाच्या आतमध्ये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला घुगूस शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात विवेक बोडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले. आपण कुठल्याही शिक्षकाला तात्पुरत्या स्वरूपात ठेवले नसून आपण नियमित शाळेत जात असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ राजकीय हेतू परस्पर आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र केले जात असल्याचे विवेक बोढे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.