चंद्रपूर - आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवत कायदा हातात घेऊन एका युवकाच्या डोक्याची कातडी सोलणाऱ्या ठाणेदार अनिल आळंदे याचे निलंबन करण्यात आले आहे. २८ एप्रिल रोजी पिटीगुडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आळंदे यांनी जिवती तालुक्यातील आंबेझरी गावच्या एका मद्यप्राशन केलेल्या तरुणाला मारहाण करत त्याच्या डोक्याची कातडी सोलली होती. या कारणाने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पिलटीगुडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेझरी गावात देविदास कंदलवार हा तरुण दारू प्राशन करून गावकऱ्यांना त्रास देत होता. याबाबतची तक्रार गावकऱ्यांनी पिटीगुडा पोलीस ठाण्यात दिली. तेव्हा ठाणेदार अनिल आळंदे ३ शिपायांना घेऊन गावात दाखल झाले. तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी आळंदे यांनी कायदा हातात घेत, थेट देविदासच्या घरात घुसून त्याला मारहाण केली.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आळंदे यांनी आपल्या खिशातील चाकू काढून देविदास याचे केस कापले. तसेच त्याच्या डोक्याची कातडी देखील सोलली. यावेळी देवीदास याच्या पत्नीने आळंदे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर तिला देखील आळंदे यांनी मारहाण केली. त्यानंतर जखमी देविदासला गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन ठाणेदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस विभागाने याची दखल घेत ठाणेदार अनिल आळंदे याचे निलंबन केले आहे.