चंद्रपूर - मला लोकसभेची उमेदवारी देण्यास पक्षश्रेष्ठी उत्सुक नव्हती. अशावेळी शरद पवारानी खंबीर भूमिका घेतली. बाळू धानोरकरांना उमेदवारी देत नसाल तर चंद्रपूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्या. आम्ही त्यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देतो आणि अमरावतीची जागा तुम्ही घ्या, अशी सूचना त्यांनी राहुल गांधी यांना दिली. त्यामुळेच मला तिकीट मिळू शकले, अशी जाहीर कबुली काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी दिली. महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसची जागा विनायक बांगडे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर अचानक त्यांचे नाव बदलवून बाळू धानोरकर यांच्या नावावर अंतिम मोहोर लावण्यात आली आहे. धानोरकरानी अर्ज भरल्यानंतर महाआघाडीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, सुनिता लोढीया, राष्ट्रवादीचे विशाल गड्डमवार, खोरीपा तसेच अन्य घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवसेनेत असताना भाजप स्थानिक पातळीवर शिवसेना संपविण्याचे डाव खेळत होता. शिवसेनेची साधी कमिटी स्थापन करण्यास सुद्धा अडचण येत होती. त्यामुळे माझ्याच कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकलो नाही. भाजपने शिवसेना आणि शिवसैनिकांचा पदोपदी अपमान केला. मात्र, यानंतरही सेनेची भाजपशी युती झाली. आपली अस्वस्थता मी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली. आपण आता सेनेत राहणार नाही हे सुद्धा सांगितले. तेव्हा मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे यांनी पुरेपूर प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे मला संधी मिळाली, असे धानोरकर यावेळी बोलताना म्हणाले.