चिमूर (चंद्रपूर) - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोलारा परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत पाच जणांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन महिला, तर तीन पुरुषांचा समावेश होता. त्यामुळे वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी दहा कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच जंगलाजवळच्या शेतामध्ये वनविभागाचे विशेष पथक गस्तीवर आहे. मात्र, अद्यापही वाघाला पकडण्यात यश आले नाही.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांना वनक्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे वन्यप्राणी व मानवी संघर्ष वाढलेले आहे. कोलारा परीसरात वाघाने मागील तीन महिन्यापासून आतापर्यंत पाच नागरिकांना ठार केले आहे. मार्च महिन्यात रात्री पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतावर गेलेल्या बालाजी वाघमारे, ८ एप्रिलला सातारा येथील यमुना पांडूरंग गायकवाड, १९ मे रोजी तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या कोलारा येथील लिलाबाई चंद्रभान जिवतोडे, तीन दिवसांपूर्वी ४ जूनला स्वतःच्या शेतात कुंपन करण्यासाठी गेलेल्या बामनगाव येथील राज्यपाल दयाराम नागोसे आणि कोलारा येथील राजेश्वर दडमल, असे वाघाच्या हल्ल्यात पाच बळी गेले.
सततच्या वाघाच्या हलल्याने परीसरात दहशत निर्माण झाली असून या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. तीन दिवसाच्या फरकाने लागोपाठ दोन व्यक्ती ठार झाल्याने वनविभागाकडून खबरदारी म्हणून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी दहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच वन विभागाच्या विशेष पथकाद्वारे जगंलाजवळच्या शेतामध्ये गस्त सुरू असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी (कोलारा कोअर झोन ) पी. एल. चव्हाण यांनी दिली.
राजेश्वर दडमल यांच्या परिवाराला वन विभागाद्वारे तत्काळ मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात आले. उर्वरीत रक्कम मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर देण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाने दिले. यावेळी डिएफओ गुरू प्रसाद, एसीएफ जाधव, डिसीएफ लडकत, एसीफ खोरे, जि. प. सदस्य गजानन बुटके, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर, शेंडे, मस्के आदी उपस्थित होते.