मुंबई - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागातील धोकादायक इमारती, महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत आढावा घेऊन गरजेनुसार आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यातील नियमांनुसार अतिक्रमणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीला पोलीस आयुक्त संजय बर्वे, मध्य रेल्वेचे विभागीय रेल प्रबधंक एस.के.जैन आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने धोकादायक इमारती, दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणी विशेष काळजी घ्यावी. उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू रहावी, पावसाळ्यात रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मे अखेरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी प्रत्येक मंडळनिहाय नियोजन करावे. दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची विशेष काळजी घ्यावी. तेथे राहणाऱया नागरिकांत जनजागृती व्हावी म्हणून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. म्हाडा आणि जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवाव्यात.
सर्व २४ प्रशासकीय विभागातील संभाव्य पाणी साचण्याच्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणाऱया पंपांची व्यवस्था करावी. चौपाटय़ांवर ९३ जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल, भारतीय लष्कर, भारतीय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सर्व आवश्यक सामग्री दिली आहे.
अतिधोकादायक इमारती - ३९८
मुंबईत असलेल्या अति धोकादायक ३९८ इमारतींपैकी घाटकोपरमध्ये ६४, अंधेरी व जोगेश्वरी पश्चिममध्ये ५१ व मुलुंडमध्ये ४७ इमारती आहेत. यापैकी १९३ इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ४६ इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. १५९ इमारतींची आतापर्यंत वीज व पाण्याची जोडणी तोडण्यात आलेली आहे. इमारती कोसळून होणाऱया दूर्घटनांमध्ये जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
मे अखेरपर्यंत नाले सफाई
२५४.६४ किलोमीटर लांबीच्या मोठ्या नाल्यांमधून एकूण ३ लाख ४९ हजार ५० टन गाळ काढण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी ७० टक्के गाळ काढण्यात येणार आहे. १४ मे पर्यंत २ लाख ४४ हजार ३३५ टन गाळ काढण्यात आला आहे. तर ४४३.८५ किलोमीटर लांबीच्या छोटया नाल्यांमधून एकूण ३ लाख ९ हजार ७७७ टनांपैकी २ लाख १६ हजार ८४३ टन गाळ काढण्यात आला. मे अखेरपर्यंत १०० टक्के नालेसफाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.