बुलडाणा- डोंगरखंडाळा येथे रविवारी विजयदशमीच्या दिवशी सकाळी एक दिवसाचे अर्भक आढळले आहे. एका निर्दयी आईने एका दिवसाच्या बाळाला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आईला शोधून काढले आहे.
रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता डोगरखंडाळा येथील उकिरड्यावर काही महिलांना एक अर्भक दिसले. या महिलांनी अर्भक जिवंत असल्याची खात्री करत त्याला तात्काळ बुलडाणा ग्रामीण पोलिसात नेले. तसेच सदर प्रकरणाची माहिती दिली. यावरून पीएसआय रामपुरे, बिटजमादार तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करुन बाळाला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
हे बाळ कोणाचे आहे याची पोलिसांनी माहिती काढली आहे. या प्रकरणी पोलिस पाटील रवि प्रल्हाद गवई यांच्या तक्रारीवर बुलडाणा ग्रामीण पोलिसात बाळाच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आईला शोधून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. आई व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.