बुलडाणा - स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार सौ. श्वेता महाले-पाटील यांच्या प्रयत्नाने सुरु होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे आज (रविवार 16 मे) रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमासाठी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष, माजी पालकमंत्री संजयजी कुटे साहेब, जिल्हाध्यक्ष अॅड. आमदार आकाश फुंडकर, चैनसुखजी संचेती, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी मा सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पूर्ण उपचार व नाश्ता, जेवण मिळणार -
चिखली येथील नगर परिषदेच्या शाळेच्या वास्तूमध्ये आ. सौ श्वेताताई महाले पाटील यांच्यावतीने शासन व लोकसहभागातून आधार कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. हे कोविड सेंटर 50 + 20 खाटांचे असुन 20 खाटा ऑक्सिजनच्या असून 50 खाटा सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी औषधे, तपासण्या, नाश्ता, जेवण सुद्धा मोफत देण्यात येणार आहे. तसेच धाड येथे ही 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असून धाड येथील कोविड रुग्णालयाचे काम अंतीम टप्प्यात असुन लवकरच धाड येथील कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत रुजू होत आहे.
रुग्ण व नातेवाईक "आधार" -
दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नाही. खाजगी दवाखान्यात पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाही. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी वणवण फिरत आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांना काही प्रमाणात का होईना आ. सौ. श्वेताताई महाले यांच्यावतीने आधार देण्यासाठी चिखली शहरात 50 + 20 खाटांचे "आधार" कोविड रुग्णालय सुरू करुन त्यात मोफत उपचार देणार असल्याने रुग्ण व नातेवाईक यांना फार मोठा आधार मिळणार आहे.
औषधांसोबतच रुग्णांना दिलासा ही दिल्या जाईल
कोरोना महामारीच्या या काळात सगळीकडे दवाखाने हाऊसफुल्ल झालेली आहेत. रुग्ण संख्या दररोज वाढत असुन बेड मिळत नाही, औषधी मिळत नाही. त्यामुळेच आधार कोविड रुग्णालय हे रुग्णांना खऱ्या अर्थाने रुग्णांवर मोफत उपचार, मोफत औषधी देऊन आधार तर देणारच आहे सोबतच दिलासा देऊन त्यांना पुरेपुर बरे करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी आमदार महाले-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या शासकीय प्रोटोकॉल पाळून होणार उद्घाटन -
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणारा कार्यक्रम हा कोरोनाच्या शासकीय प्रोटोकॉल पाळून होणार आहे. या कार्यक्रमासाठी केवळ परवानगी मिळालेल्या व्यक्तींशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही. सदर कार्यक्रम हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी गर्दी न करता फेसबुक लाईव्ह वरुनचा कार्यक्रम पाहावा असे आवाहनही आमदार सौ. महाले यांनी केले आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्राने कोरोनाच्या आकडेवारीत लपवाछपवी केली नाही'