भंडारा - भारतीय जनता पक्षाने आज भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी सुनील मेंढे यांच्या नावाची घोषणा केली. मेंढे हे सध्या भंडारा नगरपरिषदचे अध्यक्ष असून सोमवारी ते शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज भरणार आहेत.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून भंडारा-गोंदियाचे मतदार आणि राजकीय कार्यकर्ते भाजपकडून भंडाऱ्यात कोण उमेदवार उभा राहणार, याकडे लक्ष देऊन होते. अखेर आज भाजपने मेंढेचे नाव जाहीर केले. मेंढे हे पूर्वीपासून संघाचे कार्यकर्ते असून गडकरींच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. ते नगराध्यक्ष होण्यापूर्वी राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, २०१६च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगराध्यक्षाची उमेदवारी मिळवली आणि बहुमताने निवडून आले. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या २ वर्षाच्या कार्यकाळात त्यांचे आणि पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नेहमीच वाद झाले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्षाच्या नगरसेवकांकडून आणि भंडारा शहरातूनच त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे.
भाजपने त्यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे कदाचित आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भंडारा- गोंदिया लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार असून २५ मार्च हा नामांकन अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. तर ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातर्फे उद्या शक्तिप्रदर्शन करून रॅली काढत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.