भंडारा - सिटी केअर रुग्णालयातील चप्पल ठेवण्याचे रॅक अंगावर पडल्यामुळे 14 जून रोजी 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. अखेर या प्रकरणामध्ये रुग्णालयातील 8 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू असल्याने अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
भंडारा शहरातील सिटी केअर मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालयात 10 जून रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात गोंदिया जिल्ह्यातील आर्यन गौरीशंकर अवचटे (वय 9 मोरगाव अर्जुनी जिल्हा गोंदिया) या मुलाचा मृत्यू झाला होता.
आर्यनच्या वडिलांनी भंडारा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून सिटी केअर रुग्णालयाचे संचालक डॉ. मनोज चव्हाण, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. रोहित वाघमारे, डॉ. पल्लवी वाघमारे, डॉ. दीपक नवखरे, डॉ. प्रीती नवखरे, डॉ. यशवंत लांजेवार, डॉ. आशा लांजेवार या 8 डॉक्टरांवर हलगर्जी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरीशंकर अवचटे हे त्यांची पत्नी आणि मुलगा आर्यन यांच्यासह भंडारा शहरातील सिटी केअर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सासू प्रतिमा नखाते यांना भेटण्यासाठी आले होते. दरम्यान, आर्यन त्याच्या मावशीची मुलगी 5 वर्षीय त्रिज्ञा भलमे तिच्यासह चप्पल ठेवण्याच्या रॅक जवळ असताना 10 ते 12 फुटाची ही लोखंडी रॅक त्यांच्या अंगावर पडली. त्यामुळे आर्यनच्या डोक्याला जबर मार लागला, तर त्रिज्ञा ही सुद्धा जखमी झाली. प्राथमिक उपचारानंतर आर्यनला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. लोखंडी रॅक भिंतीपासून खूप लांब कोणत्याही आधाराशिवाय उभी असल्यामुळे मुलांच्या अंगावर पडली होती.