बीड - आमदार विनायक मेटे यांना २०१४ च्या बीड विधानसभेच्या निवडणुकीत ८५ हजार मते भाजपमुळेच मिळाले होते. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्याने हे यश मिळाले याचा विनायक मेटे यांनी कधीही विसर पडू देऊ नये, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मेटे यांना लगावला. शुक्रवारी विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटले होते, की 'राज्यात मी भाजप बरोबर आहे, मात्र बीडमध्ये भाजपला मदत करणार नाही. मेटे यांच्या भूमिकेवर रमेश पोकळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून भाष्य केले.
बीड लोकसभा मतदार संघात भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर हळूहळू राजकारण तापू लागले आहे. भाजपने थेट प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आयोजित पत्रकार परिषदेत रमेश पोकळे म्हणाले की, मागील ५ वर्षांच्या काळात पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून डॉ. प्रीतम मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्याचे काम केले आहे. ज्या आमदार विनायक मेटे यांनी भाजपच्या जीवावर बीड जिल्ह्यात निवडणूक लढवली त्यांच्या मदतीची आम्हाला गरज नाही.