औरंगाबाद - महानगरपालिकेत सलग चौथ्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी 'संभाजीनागर' या मुद्द्यावरून सेनेला लक्ष केले. सर्वसाधारण सभेत भाजपने शहराचे नाव न बदलणाऱ्या शिवसेना सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून कामकाजात सहभाग घेतला.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे अशी मागणी आम्ही केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही तसं स्मरणपत्रदेखील देत आहोत. महापौर नंदकुमार घोडेले सर्व प्रस्ताव घेतात, मात्र भाजपने संभाजीनगरचा दिलेला प्रस्ताव घेत नसल्याने निषेध नोंदवल्याची माहिती भाजप गेटनेते प्रमोद राठोड यांनी सांगितले. तर एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपच्या कृतीवर टीका केली आहे. शहरातील समस्यांवर आपण का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजपातील वाद रंगत असलेला पहिला मिळत आहे. महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना पुन्हा एकदा संभाजीनगरचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यात सत्ता समीकरण बदलल्याने मित्र पक्ष असलेली भाजप महानगरपालिकेच्या सत्तेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे पालिकेत विरोधी भूमिका घेत भाजपने संभाजीनगरचा मुद्दा लावून धरला आहे. शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी करत गेल्या चार महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी आक्रमकपणे मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक बैठकीत स्मरणपत्र देत दबावतंत्र वापरत आहे. अनेक स्मरणपत्र देऊनही प्रस्ताव गांभीर्याने घेत नसल्याने भाजप नगरसेवकांनी काळे कपडे घालून निषेध केला.
सर्वसाधारण सभेत होणाऱ्या कामकाजात काळे कपडे घालून नगरसेवकांनी काम केले. भाजपच्या भूमिकेवर एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. किती वर्षे त्याच मुद्द्यांवरून सभेत गोंधळ घालणार आहेत. ज्या कामासाठी महानगरपालिकेत जातात, त्या कामाचे काय, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित करत शहराच्या इतर मुद्द्यांवर आधी बोला, अशी मागणी केली.
हेही वाचा - आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते?
हेही वाचा - २ हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण कमी; केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात...