औरंगाबाद - राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होताच प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा २ दिवसांचा असणार आहे. त्यामध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई, शेतीची अवस्था यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाणार आहे.
औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. वैजापूर, कन्नड, खुलताबाद या तालुक्यातील परिस्थिती त्यांनी जाणून घेतली.
आचारसंहिता असताना देखील दुष्काळीपरिस्थितीत काम करण्याची मुभा निवडणूक आयोगाने सरकारला दिली. मात्र, काम करताना त्याची प्रसिद्धी करू नये असेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने कॅबिनेट बैठक बोलवली. या बैठकीत सर्व दुष्काळी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी आपल्या भागातील आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यात मंत्र्यांनी पाहणी दौऱ्याना सुरुवात केली आहे.
औरंगाबादचे पालकमंत्री यांनी सोमवार सकाळपासून वैजापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी टंचाई, चारा टंचाई आणि शेतीची परिस्थिती एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली. आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.