औरंगाबाद-चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शाळा(#SCHOOLREOPEN) 15 जुलै (गुरूवार) पासून सुरू झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. त्यात जिल्ह्यातील जवळपास 595 कोरोनामुक्त गावातील 852 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. रुग्णसंख्या कमी होतच नोव्हेंबर 2020 मध्ये शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र मार्च 2021 मध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. रुग्ण संख्या घटल्याने 15 जुलैपासून शाळा सुरू करत असताना शिक्षकांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शिक्षकांनी लस घेतली नाही, त्या शिक्षकांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र बहुतांश शाळेतील शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती पळशी येथील धारेश्वर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून केले नियोजन
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देत असताना शासनाने नियमावली तयार केली असून त्यानुसार विद्यार्थ्यांना सूचना देऊन प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. त्यात वर्गात प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी बसवण्यात आला. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरूनच जेवण करून येणे अनिवार्य केले असून घरूनच पिण्याचे पाणी आणण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. बऱ्याच दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने जुने मित्र भेटल्यावर उत्साहात गळा भेट घेणे, हातात हात घेणे, स्पर्श करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक भवर सर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना झाला आनंद
मागील दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. ऑनलाइन शिकत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आर्थिक परिस्थिती नसल्याने मोबाइल नसणे, ग्रामीण भाग असल्याने इंटरनेट सुविधा गती न मिळणे, अशा अडचणी येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शाळेचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे शाळा कधी सुरू होईल याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. गुरुवारी प्रत्यक्ष शाळा सुरू होताच विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांना आनंद झाला. जुने मित्र परत भेटल्याने त्यांचा उत्साह वाढला. इतकेच नाही तर ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्ष शिक्षक शिकवत असताना पुस्तकातील जास्त समजत, आलेल्या अडचणी तातडीने सोडवता येतात, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.