औरंगाबाद - महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने आज चिकलठाणा येथील वॉटर बॉटलींग युनिट सप्लायरची तपासणी केली. यावेळी धोत्रे वॉटर सप्लाय चिकलठाणा येथे पाणी पाऊचचा मोठा साठा तसेच प्लास्टिक रोल आढळले. संबंधितांना महाराष्ट्र अविघटनशील नियंत्रण कायदा २००६ नुसार रुपये १० हजार दंड करण्यात आला. यासह ४२ हातगाडी आणि दुकानावर कारवाई करत २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
धोत्रे वॉटर सप्लायकडून पुन्हा पाणी पाऊचची निर्मिती व विक्री होणार नाही, असे लिहून घेण्यात आले. शितल जलधारा कंपनीला यापूर्वी दंड आकारण्यात आलेला आहे. शहरातील पाणी पाऊच निर्मिती करणाऱ्याफॅक्टरीज, प्लास्टिक डीलर, ट्रान्सपोर्ट कंपनीच्या असोसिएशनला प्लास्टिक कॅरीबॅग, पाणी पाऊच यांची विक्री, वितरण आणि साठा न करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. यापुढे प्लास्टिकची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही, तसेच गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, अशीही ताकीद देण्यात आली.
शहरात विविध पथकांकडून वॉर्ड निहाय दुकाने गाड्यांची आज तपासणी करण्यात आली. ही कारवाई साहाय्यक घनकचरा आयुक्त नंदकिशोर भोबें, वार्ड अधिकारी मीरा चव्हाण, स्वच्छता निरीक्षक कृष्णा विसपुते, नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली.