अमरावती - टरबूज भरण्यासाठी शेतात जात असलेल्या उत्तरप्रदेशमधील ट्रकला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने पेट घेतल्याची घटना घडली. ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर परिसरात घडली असून यात 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल धामणगाव रेल्वेच्यावतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास उत्तरप्रदेशमधील एक ट्रक तळेगाव दशासर परिसरातील एका शेतात व्यापाऱ्याने खरेदी केलेले टरबूज भरण्यासाठी जात होता. ट्रकमध्ये गवत असल्याने ट्रकचा स्पर्श हा विद्युत तारांना झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली गेली.