अमरावती - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीची उमेदवारी नवनीत राणा यांना देताना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य असा निर्णय घेतला. त्यांच्या उमेदवारीबाबत कोणालाही संशय नकोच, असे स्पष्टीकरण माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केले.
नवनीत राणा यांच्या उमेदवारी संदर्भात आज शहर काँग्रेसच्यावतीने चौबळ वाडा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. शहराचे पहिले महापौर डॉ. देवीसिंह शेखावत, बदनेराचे आमदार रवी राणा, काँग्रेसचे शहर अध्यक्ष कीशीर बोरकर, माजी मंत्री यशवंत शेरेकर, माजी महापौर विलास इंगोले, वंदना कंगाले, महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रावसाहेब शेखावत यांनी नवनीत राणा या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार आहेत. त्या निवडून आल्या की दुसरीकडे वगैरे गेल्या तर? असे जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात काही एक तथ्य नाही. यामुळे आपण कोणी कुठलाही गैरसमज करू नये, असे पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना म्हटले.
विद्यमान खासदार हे खोटे बोलत आहेत. अमरावतीकरांना माहिती आहे, जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या तेव्हा रेल्वेमंत्री असणारे लालूप्रसाद यादव हे अमरावतीत आले आणि ताईंच्या शहरात मॉडेल रेल्वे स्टेशन मी देणार असा शब्द देऊन तो पाळला. यावेळी अशा व्यक्तिंना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी नवनीत राणा यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहवे असे आव्हान केले.
आमदार रवी राणा यांनी, आता युवकांचे युग असून देवीसिंह शेखावत आता जसे आम्हाला आशीर्वाद देत आहे अगदी तसेच आनंदराव अडसूळ यांनी आता म्हातारपणात आराम करावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.