अमरावती - अचलपूर तालुक्यातील 'वेदांत'ने अवयव दान केल्याने तिघांना जीवनदान मिळाले आहे. वेदांत ब्रेनडेड अवस्थेत गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी 02 डिसेंबरला आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय समाजाला प्रेरक ठरला आहे.
हरम येथील दुष्यंतसिंह बद्रटिये आणि अंजली या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांत शिकवणीसाठी जात असताना त्याचा अपघात झाला होता. 27 नोव्हेंबरला झालेल्या या अपघातानंतर वेदांतची वाचण्याची शक्यता मावळली होती.
अमरावती येथे खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तो ब्रेनडेड अवस्थेला गेला. यानंतर त्याच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
डॉ. आशिष भंसालींसह पुनर्जीवन फाऊंडेशनचे डॉ.राजेश उभाड, डॉ.हर्षराज डफडे, जितेंद्र रोडे यांनी या निर्णयाचे स्वागत करून 02 डिसेंबरला अवयवदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली. यावेळी वेदांतची किडनी व यकृत नागपूरला पाठवण्यात आले. डोळे अमरावतीला हरिना फाऊंडेशन अंतर्गत आय बँकेच्या सुपूर्द करण्यात आले.
यासाठी दिल्ली येथील डॉ.अजिताभ श्रीवास्तव आणि नागपूर येथील डॉ.प्रकाश जैन यांच्यासह त्यांच्या चमूने तब्बल दीड तास शस्त्रक्रिया केली. यानंतर ‘ग्रीन कॅरिडोर’ मार्फत अवयव नागपूरला रवाना करण्यात आले.