अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी उच्च शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाने राज्यातील सातही अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. कालबद्ध पदोन्नतीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेने 3 जूनला कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केले होते. 10 ते 17 जून दरम्यान कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. आज आपल्या मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा मोर्चा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशननेही विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. यामुळे आजच्या मोर्चाचे नेतृत्व विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्यासह नागपूर टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी केले. यावेळी अमरावती विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले. डॉ. जगताप यांनी या निर्णयावर सकारात्मक विचार व्हावा यासाठी हे निवेदन शासनाकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.
दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी आज कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाची दखक शासनाने घेतली नाही, तर 25 जूनला पुणे येथील उच्चशिक्षण संचालक कार्यालयावर राज्यातील सर्व चौदा अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल. आम्हाला न्याय मिळाला नाही, तर 29 जूनला लाक्षणिक संप पुकारण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही क्षणी चौदाही अकृषी विद्यपीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेदमुदत काम बंद करतील, असा इशारा त्यांनी दिला.