औरंगाबाद - पैठणचे जायकवाडी धरण ९१.९९ टक्क्यांवर पोहचल्यानंतर बुधवारपासून जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी दिवसभरात 4 दरवाजे उघडण्यात आले होते. गुरुवारी त्यात वाढ करून धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या फुटावर उघडण्यात आले आहेत.
गुरुवारी आठ दरवाजातून 4 हजार 192 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात 91.87 टक्के इतका पाणीसाठा आहे. नगर आणि नाशिकमधील आवक आता बंद झाली आहे. सध्या धरणातील मुख्य दरवाजातून, डावा-उजवा कालवा आणि वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. हे पाणी गोदावरी नदी पात्रातून औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांची तहान भागणार आहे. गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या सर्व बधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जायकवाडीतून सध्याचा विसर्ग -
सद्या नदीपात्रात दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27 या 8 दरवाज्यांमधून 524 क्यूसेक या वेगाने 4192 क्यूसेक, तर पैठण जलविद्युत केंद्रामधून 1589 क्यूसेक विसर्ग असा एकूण 5781 क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यातून 2300 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.