अमरावती - शेतमाल तारण योजनेत २ कोटी ९९ लाखांचा घोटाळ्याचा आरोप झाल्याने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली होती. धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या लेखापरीक्षण अहवालात भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे चौकशीअंती बाजार समिती संचालक मंडळ दोषी आढळल्याने जिल्हा निबंधकांनी अखेर समिती बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली आहे.
शेतमाल तारण योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांऐवजी बाजार समितीचे सभापती व अन्य संचालकांनी घेतल्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता. काही संचालकांनी दहा-दहा बोगस प्रकरणे तयार करून अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर बाजार समितीच्या संचालकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या बाजार समितीवर चौकशी समिती बसवण्यात आली होती. आता या चौकशी समितीला संचालकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली आहे.