अकोला - ट्रक मधून शंभर पोते सुगंधित सुपारी वाहून नेणाऱ्या ट्रक चालक व वाहकाला पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाईत नेहरू पार्क चौकात ताब्यात घेतले आहे. सुगंधित सुपारीची किंमत बारा लााख आणि ट्रक २० लाख असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पुण्यातून गुटखा वाहतूक जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे पोलीस अधिकारी एपीआय नितीन चव्हाण यांना याविषयी गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करीत ट्रक क्र. केए १६ सी १७८० नेहरू पार्क चौकात थांबवला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये १०० पोते सुगंधीत सुपारी मिळून आली.
पोलिसांनी ट्रक व चालक योगेश सिंह तोमर, क्लिनर देवेनकुमार पाटणकर (दोघेही राहणार बैतुल) यांना ताब्यात घेतले. २० लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी दत्तात्रय ढोरे, सुनील राऊत, शक्ती कांबळे, मनोज नागमते, प्रदीप सावरकर यांचा सहभाग होता.