अहमदनगर - मराठा आरक्षण मुद्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात बोलताना सर्वोच्च न्यायालयाने जरी मराठा आरक्षण नामंजूर केले असले, तरी आरक्षणासाठी अजूनही काही मार्ग आहेत. ते निश्चित करून पुढे जाता येईल, असे म्हटले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीस आपण राज्यात दौऱ्यात असल्याने उपस्थित नव्हतो. मात्र, निश्चितपणे यावर सरकार गंभीर असून आरक्षणासाठी अजूनही काही मार्ग असून ते अभ्यासून काढले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरणासाठी गर्दी करू नका -
राज्याला मिळणाऱ्या लसी या पुरेशा नाहीत. ही वस्तुस्थिती असली, तरी ज्या लसी उपलब्ध होत आहेत, त्या दिल्या जात आहेत. मात्र, 150 लसी असताना 500 लोक लसीकरण केंद्रावर येत असल्याने गर्दी होत असून त्यातून संसर्गाचा धोका दिसून येतो. तसेच गर्दीमुळे अनेक लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत आहे. त्यामुळे मेसेज आल्यानंतरच नागरिकांनी केंद्रावर जावे, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
राज्याचे स्वतंत्र अॅप आणि सर्व्हर द्या -
केंद्र सरकारच्या लसीकरणाबाबतचे ओफ्टवेअर असून त्यात काही अडचणी येत आहेत. अनेक नागरिकांना आपले शहर, जिल्हा सोडून इतर शहर किंवा जिल्ह्यात लसीकरणासाठी सांगितले जाते. तसेच अनेक जेष्ठ नागरिक, गरीब नागरिकांकडे मोबाईल असतीलच असे नाही, त्यांचीही अडचण होत आहे. केंद्राच्या अप्लिकेशनमधील या त्रुटी असल्याने राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन आणि सर्व्हर असावा, ज्यामुळे सध्या उडणारे गोंधळ होणार नाहीत, अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - येणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून येणार - प्रशांत जगताप