अहमदनगर - उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर माठांची मागणी वाढते. मात्र, ऐन हंगामात लॉकडाऊन सुरू झाल्याने माठ तसेच पडून आहेत. त्यामुळे कुंभार व्यवसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.
कुंभारांनी लाखो रुपयांची माती तुडवून तिला फिरत्या चाकावर आकार दिला. परंतु, तयार करण्यात आलेल्या माठांना मागणी नसल्याने कुंभार आर्थिक अडचणीत सापडलाय. उन्हाळ्यात मातीचे रांजण तसेच माठांना मोठी मागणी असते. दरवर्षी कुंभार व्यावसायिक उन्हाळ्याचे पूर्वनियोजन करून माठांचे उत्पादन करत असतात. फेब्रुवारीपासूनच त्याची विक्री सुरू होते. उन्हाचा कडाका वाढल्यावर मागणी देखील वाढते. एप्रिल, मे महिन्यात माठांच्या मागणीत आणखी वाढ होते.
गरिबांचा फ्रीज म्हणून माठ, रांजणाला संबोधले जाते. मात्र, आज हाच गरिबांचा फ्रीज लॉकडाऊनमुळे कुंभार व्यावसायिकांच्या घरातच पडून आहे. कोरोनामुळे राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. तसेच कुंभार व्यावसायिकांना ते परगावी पाठवता येत नसल्याने आणखी अडचणी वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे उन्हाळ्याच्या सीझनमध्येच त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
शिर्डी जवळील अस्तगाव हे हॉटेल आणि ढाब्यासाठी लागणाऱ्या तंदुर विक्रीचे मोठे केंद्र आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये ढाबे बंद आहेत. यावेळी नवीन तंदुर बसवता येतील. मात्र, कामगार मिळत नसल्याने तंदुरची विक्री देखील ठप्प झाली आहे. राज्यातील कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय यामुळे डबघाईस आलाय. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता कुंभार व्यावसायिकांनी हंगामापूर्वी लाखो रुपये खर्चून मातीची भांडी बनवली होती. मात्र, लॉकडाऊनचा मोठा फटका त्यांना बसलाय. त्यामुळे बाजारात विकण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. किंवा आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी हे व्यवसायिक करत आहेत.