अहमदनगर - पंढरपूरप्रमाणे शिर्डीतही आषाढी एकादशी दरवर्षी मोठ्या भक्तीभावात साजरी केली जाते. त्यानिमित्ताने साईबाबांचे मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्याचे काम बंगळुरू येथील साई भक्त सेवा मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने बंगळुरू येथील साई भक्त सेवा या मंडळाच्यावतीने मागील २ वर्षापासून साई समाधी मंदिरात फुलांची सजावट करण्यात येत आहे. तर यंदाचे हे तीसरे वर्ष आहेत. या वर्षी तब्बल १० लाख रूपयांच्या फुलांनी साई मंदिर सजवण्यात येत आहे. तर तब्बल ६ लाख फुले यासाठी वापरण्यात येणार असल्याचे साई भक्तांकडून सांगण्यात आले आहे.
साई भक्त सेवा या परिवारातील तब्बल ४० भाविक आपल्या स्वतःच्या खर्चाने मंदिरात फुलांची सजावट करण्याचे काम करत आहेत. बुधवारपासूनच संपूर्ण साई मंदिर फुलांनी सजावट करण्यासाठी २०० कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी प्रसन्न मनाने भाविक मंदिरात आल्यानंतर नजरेस फुलांची सजावट मनमोहून टाकणारी असणार आहे.