पॅरिस - टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख असलेला स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररच्या नावावर एक नवा विश्वविक्रम झाला आहे. फ्रेंच ओपनमध्ये फेडररने काल (शुक्रवारी) आपला 400 वा ग्रँड स्लॅम सामना खेळला. अशी कामगिरी करणारा फेडरर हा टेनिसविश्वातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.
37 वर्षीय रॉजर फेडररने आपला पहिला ग्रँड स्लॅम सामना 25 मे 1999 ला खेळला होता. रॉजरने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत कास्पर रूडवर 6-3, 6-1, 7-6 (10/8) ने मात करत आपला 400 वा ग्रँडस्लॅम सामना विजयाने साजरा केला.
फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत फेडररचा सामना अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयरशी होणार आहे. 20 ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या फेडररला फक्त एकदाच फ्रेंच ओपनचा किताब जिंकता आला आहे. त्याने २००९ मध्ये फ्रेंच ओपन आपल्या नावावर केली होती. तर क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदालने विक्रमी ११ वेळेस फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले आहे.