लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताला पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर ढकलले. संपूर्ण स्पर्धेत अफलातून प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य सामन्यात खराब फलंदाजीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले. हा पराभव नेमका कसा झाला याचे समीक्षण होण्यास सुरुवात झाली आहे. आणि यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मांमध्ये मतभेद असल्याचे म्हटले जात आहे.
या दोन्ही खेळाडूंमधील मतभेद हे निर्णय प्रक्रियेमुळे होत आहेत असे म्हटले जात आहे. टीम इंडियातील सर्व निर्णय विराट आणि कोच शास्त्रीच घेतात. भारतीय संघात दोन गट पडले आहेत. एक गट रोहित सोबत तर दुसरा गट कोहली सोबत आहे. जे खेळाडू विराट निवडतो ते संघात कायम असतात. उदाहरणार्थ के. एल. राहुलची कामगिरी कशीही झाली तरी त्याला संघात स्थान दिले जाते पण, रोहित सोबत असे होत नाही. रोहित आणि बुमराह या खेळाडूंचे निर्णय कामगिरीच्या आधारावर केले जात असल्याचाही चर्चा आहे.
उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचे खापर रवी शास्त्रींवरही फोडले जात आहे. शिवाय, कर्णधार कोहलीने घेतलेल्या निर्णयावर दिग्गज खेळाडूंकडूनही कडाडून टीका होत आहे. भारताचे पहिले तीन फलंदाज ५ धावांवर बाद झाले होते. तेव्हा चौथ्या क्रमांकावर धोनीला फलंदाजीसाठी पाठवायला हवे होते. अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिली होती. जर धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता असे त्यांनी म्हटले आहे.