लंडन - भारताचा आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने पराभव केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच भारताचा नामुष्कीजनक पराभव टळला. मात्र, सामन्यातील या पराभवानंतर जडेजा पूर्ण खचून गेला होता आणि तो सतत रडत होता, अशी माहिती त्याची पत्नी रीवाबाने दिली.
उपांत्य सामन्यात रविंद्र जडेजा मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा भारतीय संघाची अवस्था वाईट होती. त्यावेळेला भारतीय संघाच्या ६ बाद ९२ धावा झाल्या होत्या. तेव्हा जडेजा आणि धोनीने शतकी भागिदारी करत भारताला सामन्यात परत आणले. मात्र, मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्याच्या नादात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर जडेजा झेलबाद झाला. त्यानंतर धोनीही धावबाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा संपूष्टात आल्या.
भारताच्या या पराभवानंतर जडेजा सतत रडत होता. तसेच तो, मी बाद झालो नसतो तर आम्ही सामना जिंकला असता, असे बडबडतही होता, अशी माहिती जडेजाची पत्नी रीवाबाने दिली. ही माहिती तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.