अहमदाबाद - कर्णधार विराट कोहली (नाबाद ८०), रोहित शर्मा (६४), हार्दिक पांड्या (१७ चेंडूत ३९) आणि सूर्यकुमार यादव (१७ चेंडूत ३२) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी २२५ धावांचे अवजड लक्ष्य ठेवले. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. भारताने २० षटकात २ बाद २२४ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कर्णधार विराट कोहली, रोहित सोबत सलामीला उतरला. या दोघांनी इंग्लंड गोलंदाजीची पिसे काढली. विराट-रोहित जोडीने पॉवर प्लेमध्ये, ६ षटकात बिनबाद ६० धावा चोपल्या. रोहितला ८व्या षटकात वैयक्तिक ४५ धावांवर असताना जीवनदान मिळाले. या षटकातील ५व्या चेंडूवर त्याने फटका मारला. पण मार्क वूडने तो कॅच सोडला. यानंतर रोहितने षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. त्याची झंझावती खेळी बेन स्टोक्सने क्लीन बोल्ड करत संपवली. रोहितने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. विराट-रोहितने ९ षटकात ९४ धावांची सलामी दिली.
रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने आदिल रशिदच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार खेचत दहाव्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. यानंतर त्याने ख्रिस जॉर्डनने फेकलेल्या १२ व्या षटकात सलग तीन चौकार मारले. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याचा अप्रतिम झेल जेसन रॉयने टिपला. सूर्यकुमारने १७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा वसूल केल्या.
विराटने एक बाजू लावून धरत संयमी अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याने ५२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ८० धावा केल्या. हार्दिकने ख्रिस जॉर्डने फेकलेल्या १९ व्या षटकात सलग दोन षटकार खेचले. त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टोक्स आणि रशिद यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - IPL २०२१ : नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स नव्या जर्सीत दिसणार
हेही वाचा - NZ Vs Ban १st ODI : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय; बोल्टचे ४ बळी