लंडन - इंग्लंडचा तडाकेबाज सलामीवीर फलंदाज जोस बटलरला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला खास रणनिती आखावी लागेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्त केले आहे. बटलरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ऑसी गोलंदाजांची पिसे काढत नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसरा सामना जिंकत तीन सामन्याच्या मालिकेत २-० अजिंक्य आघाडी घेतली आहे.
मिचेल स्टार्क म्हणाला की, 'आम्हाला तिसऱ्या टी-२० सामन्यात आणि आगामी एकदिवसीय मालिकेत जोस बटलरविरुद्ध खास रणनिती आखावी लागेल. त्याला स्वस्तात रोखण्याचे प्रयत्न आम्हाला करावे लागतील. कारण तो एक पावर फुल्ल खेळाडू असून काही षटकात तो सामन्याचे चित्र बदलवू शकतो.'
बटलरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत ताबडतोड फलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात ५४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७७ धावा चोपल्या.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात मिचेल स्टार्कचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश होता. पण त्याला गोलंदाजीत आपली छाप सोडता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याने ३ षटकात ३० धावा दिल्या. त्याला या सामन्यात एकही गडी बाद करता आला नाही. दुसऱ्या सामन्यात ४ षटकात त्याने २५ धावा देत १ गडी टिपला.
हेही वाचा - IPL २०२० : एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक...
हेही वाचा - 'जर रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला, तर ठोकू शकतो द्विशतक'