मुंबई - बिग बॉस मराठी पुन्हा सुरू होत असल्यामुळे यावेळी स्पर्धक कोण असणार याची सध्या जोरदार चर्चा आहे. महेश मांजरेकर सूत्रसंचालन करीत असलेल्या या शोमध्ये दिग्गज स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. मराठी मालिका, नाटक आणि सिनेक्षेत्रासह अनेक क्षेत्रातील स्पर्धक यावेळी दिसतील. यंदाच्या स्पर्धकांमध्ये राजकीय क्षेत्रातील लोकही सहभागी होणार का याची उत्सुकता आहे.
बिग बॉस मराठीचा आता दुसरा प्रोमो रिलीज झालाय. यात एक लावणी नृत्यांगणा ढोलकीच्या तालावर नाचताना दिसतेय. याचे कॅप्शनदेखील वेगळे आहे. कलर्स मराठीच्या या ट्विटमध्ये लिहिलंय, ''आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, बॉस मराठी २च्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार?'' ही नृत्यांगणा दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे, लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकर.
सुरेखा पुणेकर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात येणार या गोष्टीला या प्रोमोमुळे दुजोरा मिळाला आहे. सुरेखा पुणेकर शोमध्ये आल्या तर बिग बॉसच्या घरात बरीच धमाल होऊ शकते याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही.