मुंबई - प्रथम बंगाली, नंतर हिंदी आणि आता मराठीत बनलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांना पसंत पडतेय. स्टार प्रवाहवरील या मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्त्री सक्षमीकरणाची ही गोष्ट एका ‘आईच्या’ दृष्टिकोनातून सांगण्यात आली आहे. आपलंस वाटणारं कथानक आणि आपलीशी वाटणारी पात्र यामुळेच आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
या मालिकेत आई म्हणून अरुंधतीने आतापर्यंत आपल्या सर्व जबाबदाऱ्या निगुतीने पार पाडल्या आहेत. एकीकडे अनिरुद्धसोबतच्या नात्याचा गुंता सोडवत असताना आता अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे यश गौरीचं नव्याने खुलणारं नातं, तर दुसरीकडे अनघा आणि अभिषेकच्या नात्याची नव्याने होणारी सुरुवात यावर तिची नजर आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकाकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात घडणारे प्रसंग यातून दर्शविण्यात येतात. कसोटीच्या या प्रसंगांना प्रत्येक घरातील गृहिणी ताकदीनीशी सामोरी जाते. प्रत्येक घरात अरुंधती पाहायला मिळते. मुलांच्या जोडीदाराच्या निवडीमध्ये देखिल अरुंधती त्यांना मोलाची साथ देणार आहे. मुलांच्या जोडीदाराच्या निवडीमध्येदेखील अरुंधती त्यांना मोलाची साथ देणार आहे.
मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात अरुंधतीने कोणतीही कसर राहू दिली नाही. यश गौरीचं नातं अनिरुद्धला पटलेलं नसलं तरी अरुंधतीने मात्र ठाम भूमिका घेत या दोघांच्या नात्याला होकार दिला आहे. इशाचं अनोळखी मुलामध्ये गुंतणं व त्यामुळे तिच्या आयुष्यातही सध्या बरेच चढउतार सुरु आहेत. ज्या मुलाच्या प्रेमात इशा पडली आहे त्याची पार्श्वभूमी फारशी बरी नाही. अर्थात इशाला याची जाणीव नसली तरी अरुंधतीने हे अचूक हेरलं आहे. त्यामुळे तिन्ही मुलांच्या आयुष्यातल्या या नव्या वळणाला सामोरं जाण्यासाठी अरुंधतीने कंबर कसली आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - स्टार प्रवाहच्या कलाकारांचा दाक्षिणात्य नृत्य-तडका!