मुंबई - कोरोनाने जगभरात थैमान माजविले असताना वैद्यविक क्षेत्रावर सर्वाधिक ताण आलाय. वाढत्या रुग्णसंख्येची वैद्यकीय काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेसची कमतरता जाणवू लागलीय. अशातच वैद्यकीय क्षेत्रापासून दूर गेलेल्या मेडिकल स्टाफला मदतीसाठी साकडे घालण्यात आले. डॉ आशिष गोखले, जो अभिनयक्षेत्रात व्यस्त होता, त्याने त्याची अभिनयाची आवड बाजूला सारून थेट रुग्णसेवेसाठी धाव घेतली. या कठीण काळात त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी केलेल्या कामामुळे त्यांना चोहीकडून आशीर्वाद मिळताहेत.
पुन्हा एकदा त्याच्या डॉक्टरकीकडे
डॉ. आशिष गोखले सध्या 'तारा फ्रॉम सातारा' यांसारख्या टिव्ही मालिका आणि 'गब्बर इज बॅक' व 'लव्ह युवर फॅमिली' या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसतोय. 'सेक्शन ३७५' चे दिग्दर्शक मनीष गुप्ता यांच्या अद्याप नाव जाहीर न झालेल्या आगामी बिग बॅनर चित्रपटातून तसेच, 'लग्न कल्लोळ' या मोहम्मद बर्मावाला यांच्या मराठी चित्रपटातून तो झळकणार आहे. देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध सुरू केल्यावर मूळचा डॉक्टर असलेला हा अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या डॉक्टरकीकडे वळला आणि त्याने त्याचा पूर्ण वेळ आजारी रुग्णांची सेवा करण्यासाठी दिला.
कोरोना काळातील मानसिक दबावावर महत्वाचा संदेश
कोरोना विषाणूचा जगात स्फोट झाल्यापासून जग जणू स्तब्ध झाले आहे, कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाःकार माजवला आहे. ऑक्सिजन, बेड्स आणि वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी लोक रस्त्यावर वणवण करत आहेत. अशातच, आता अभिनेता बनलेला डॉक्टर आशिष गोखले यानेसुद्धा भारतीयांसाठी सेवेसाठी आपल्या दुसऱ्या कामांना बाजूला सारत कोरोना लढ्यात उडी घेतली आहे. कोरोना काळातील मानसिक दबावावर त्याने एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे जो सर्वांसाठी उपयोगी आहे. सध्याच्या संकटकाळात शांत राहून परिस्थितीचा सामना करण्यातच शहाणपण असल्याचे सांगत ‘मोगरा फुलला’ फेम आशिष गोखले याने परिस्थितीजन्य तणावाचा माणसाच्या मनावर आणि शरिरावरही कसा विपरित परिणाम होतो, हे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या भितीमुळेच आपली प्रतिकारशक्ती कमी
याबद्दल पुढे सांगताना डॉ आशिष पुढे म्हणाला की, ‘या संपूर्ण प्रक्रियेला केवळ २ मिनिटे वगैरे लागू शकतात. आता विचार करा, हीच प्रक्रिया गेले वर्षभर आपल्या शरिरात सुरू असेल, तर कोरोनाबद्दलच्या या सततच्या भितीमुळेच आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. या समस्यांसाठी सकारात्मक विचार हा एक उत्तम उपाय आहे. मला हा आजार होणारच नाही, कोरोना विषाणू मला शिवणारच नाही, असे म्हणण्यापेक्षा मी कुणालाही कोरोनाचा बळी ठरू देणार नाही, असे म्हणणे जास्त महत्वाचे ठरेल. यामुळे तुमचा दृष्टीकोन बदलेल आणि तुमच्या जगण्याची पद्धतही बदलेल. यापेक्षा महत्वाचे म्हणजे, या विषाणूची पूर्ण माहिती करून घ्या आणि तुम्ही वाचत असलेल्या कोणत्याही मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, आपले हात स्वच्छ ठेवणे, आरोग्यपूर्ण आहार व व्यायाम नियमितपणे चालू ठेवणे या सरकारने आखून दिलेल्या काही दैनंदिन प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा’.
कोरोनाच्या ह्या युद्धजन्य परिस्थितीत, स्वतःची रोग प्रतिकार शक्ती टिकविण्यासाठी सकारात्मक विचार हाच एकमेव मार्ग असल्याचे अभिनेता डॉक्टर आशिष गोखले याचे म्हणणे आहे.