अभिनेता सुबोध भावेने राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. आरजे अनुष्काच्या साथीने त्याने राहुल यांना चांगले बोलते केले होते. मात्र ही गोष्ट त्याच्या काही फॅन्सना आवडलेली नाही. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
खरेतर सुबोध भावे हा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे तो शिवसेनेशी संबंधित असल्याचा शिक्का त्याच्यावर आहे. शिवसेनेतील कार्यकर्त्यांना त्याचे हे वागणे न पटणे साहजिक आहे. ट्रोल करणाऱ्यांना ही संधी चालून आली. या निमित्ताने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची त्यांची हौस भागत असून सुबोधलाही ते दुषणं देत आहेत.
ट्रोल होतोय हे लक्षात आल्यानंतर सुबोध भावेने फेसबुकवर आपली भूमिका मांडली आहे. परंतु त्यालाही कॉमेंट करीत ट्रोलकरी आपला राग व्यक्त करताना दिसतात.
सुबोध एक उत्तम कलाकार आहे. त्याने लोकमान्य टिळकांपासून, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकरांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हाच धागा पकडत त्याने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. "लोक मला राहुल गांधींसारखे दिसतो असे म्हणतात, त्यामुळे तुमच्यावर बायोपिक झाल्यास मी भूमिका करेन", असे राहुल यांना सुबोध म्हणाला होता. त्यावर राहुल यांनीही मिश्किलपणे, "तुम्ही माझ्यासारखे नाही तर मी तुमच्यासारखे दिसतो", असे म्हटले होते. नेमकी हीच गोष्ट ट्रोल करणाऱ्यांना खटकल्याचे कॉमेंटवरुन दिसते.