सोलापूर- गायक आनंद शिंदे हे राजकारणात येणार असून सोलापूर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे शिंदे यांनी सोलापूरात जाहीर केले आहे.
संपूर्ण राज्यात गायक म्हणून प्रसिद्धी मिळालेले आणि प्रल्हाद शिंदे यांचा वारसा लाभलेले गायक आनंद शिंदे हे राजकारणात उतरत असल्याचे त्यांनी आज सोलापूरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. आनंद शिंदे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ किंवा माळशिरस या मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माळशिरस हे दोन मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेले मतदारसंघ आहेत. आरक्षित असलेल्या या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आनंद शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आनंद शिंदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे जाहीर करतानाच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील त्यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे.
रिपब्लिकन नेत्यांनी कलावंताचा फक्त वापर करून स्वतः मोठे झाले. मात्र, कलावंतांकडे कायमच दुर्लक्ष केल्याचा आरोप आनंद शिंदे यांनी केला आहे.
रिपब्लिकन नेत्यांनी लहानात लहान ते मोठ्या कलावंताचा फक्त वापर करून घेतला त्यामुळेच आपण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षांमध्ये येऊन निवडणूक लढवीत असल्याचे आनंद शिंदे यांनी जाहीर केले.