मुंबई - आपल्या क्युट हास्याने कोट्यवधी तरुणींच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या आर. माधवनचा आज वाढदिवस आहे. 'रहना है तेरे दिल मे'मधील 'मॅडी' ते थ्री-इडियट्स मधील 'फरहान'पर्यंत त्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
माधवनने बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीवरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याचा जन्म झारखंड येथील जमशेदपूर येथे १ जून १९७० मध्ये झाला होता. त्याच्या मित्रांमध्ये तो 'मॅडी' नावानेच प्रसिद्ध होता. त्यामुळेच 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातही त्याला हेच नाव देण्यात आले.
माधवन अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी शिक्षक होता. त्याने कोल्हापूरमध्ये शिक्षक म्हणून कामही केले आहे. मुंबईच्या के. सी. कॉलेजमधून त्याने पब्लिक स्पीकिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. शिक्षणादरम्यानच त्याने त्याचे फोटो एका मॉडेलिंग एजंसीला दिले होते. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्याला सैन्यदलात जायचे होते. मात्र, त्याचे नशिब त्याला ग्लॅमरच्या क्षेत्रात घेऊन आले.
१९९६ मध्ये तो एका जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीनंतर त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी 'इरुवर' चित्रपटाची ऑफर दिली होती. माधवनने या चित्रपटासाठी स्क्रिन टेस्टही दिली होती. मात्र, पुढे त्याची या चित्रपटासाठी निवड झाली नाही. त्यानंतर मात्र, मणिरत्नम यांच्या बऱ्याच चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली होती.
माधवनने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. 'बनेगी अपनी बात', 'तोल मोल के बोल' आणि 'घरजमाई' या मालिकेमध्ये तो झळकला होता. माधवनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बरेचसे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'रंग दे बसंती', 'थ्री-इडियट्स', 'तनु वेड्स मनु' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
माधवनच्या चित्रपट करिअरप्रमाणेच त्याची लव्हस्टोरीदेखील तेवढीच रंजक आहे. माधवनच्या पत्नीचे नाव सरीता माधवन असे आहे. सरिता एअरहोस्टेसचे प्रशिक्षण घेत असताना माधवनला भेटली. १९९२ मध्ये ती माधवनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासमध्ये प्रशिक्षण घेत होती. तिला नोकरी मिळाल्यानंतर तिनेच मला डेटवर नेले होते, असे माधवनने सांगितले. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर माधवन आणि सरिताने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली.
माधवन आज ४८ वर्षांचा झाला आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून त्याला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा मिळत आहेत. त्याचे बरेचसे फोटो देखील व्हायरल होत आहेत. सध्या तो नंबी नारायण यांच्या बायोपिकवर काम करत आहे. या बायोपिकचे नाव 'रॉकेट्री- द नंबी इफेक्ट' असे आहे. या चित्रपटात तो एका शास्त्रज्ञाच्या रुपात दिसणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारत, प्रिन्सेटॉन, स्कॉटलॅन्ड, फ्रान्स आणि रशिया येथे हा चित्रपट शूट केला जाणार आहे.