मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून स्वप्नील जोशीची ओळख आहे. कृष्णाच्या भूमिकेत आपल्या लोभस गोड हास्याने स्वप्नीलने बालपणीच प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर आपल्या एकापेक्षा एका सरस भूमिकेने त्याने मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवले. आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्याने लाखो चाहत्यांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात त्याने साकारलेल्या काही खास भूमिकांविषयी...
स्वप्नीलने वयाच्या ९ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. होय, स्वप्नीलला जरी महाभारतातील कृष्णाच्या रुपात ओळखले जात असले तरीही त्यापूर्वीच तो रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेतही झळकला होता. 'रामायण'मध्ये तो रामाचा पुत्र 'कुश'च्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने महाभारतातील 'कृष्ण' साकारला. पुढे त्याला याच भूमिकेद्वारे ओळख मिळाली.
हेही वाचा -'फ्रेन्ड्स' सीरिज फेम जेनिफर एनिस्टनने आपल्या पहिल्याच पोस्टने रचला विश्वविक्रम
स्वप्नीलने हिंदी आणि मराठी दोन्ही क्षेत्रांत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
'मुंबई - पुणे - मुंबई', 'दुनियादारी', 'मंगलाष्टका वन्स मोअर', 'तुहीरे', 'मितवा', यांसारख्या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं.
चॉकलेट बॉयची प्रतिमा साकारल्यानंतर त्याने 'रणांगण' या चित्रपटात व्हिलनचीही भूमिका साकारली. या चित्रपटात तो पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला.
काही महिन्यांपूर्वीच त्याचा 'मोगरा फुलला' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही त्याने चौकटीबाहेरची भूमिका साकारत मध्यमवयीन व्यक्तीची भूमिका साकारली होती.
हेही वाचा -'फत्तेशिकस्त'मधील 'हेचि येळ देवा नका...' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला
छोट्या पडद्यावरही त्याने बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. अलिकडेच त्याच्या 'जिवलगा' या मालिकेचा समारोप झाला. या मालिकेतून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली.