बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर कीर्तनकाराच्या रुपात दिसणार आहेत... बिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर आले. आता जर असे विविध क्षेत्रातील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य म्हणून आले तर काय होईल हे बघणे रंजक असणार आहे.
जनजागृती, लोकशिक्षण, पुराण कथेतून संस्कृती दर्शन आणि थोर परंपरेची जाणीव करून देणारा अतिशय सशक्त लोककलेचा प्रकार म्हणजे कीर्तन. आणि कीर्तनकार हा मुळातच पुराण इतिहासातील आदर्श दाखले देऊन आजच्या समाजाला कस वागावं, कस जगावं, हे कानपिचक्या देऊन शिकवतो. यासाठीच या नवीन प्रोमोमध्ये मांजरेकर किर्तनकाराच्या लूकमध्ये दिसतायत की त्यामागे अजून काही वेगळं कारण आहे याची उत्सुकता आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनचा पहिला प्रोमो समोर आला तेव्हा यात केंदीय मंत्री रामदास आठवले दिसणार अशी चर्चा रंगली. दुसऱ्या प्रोमोत ते अस्सल रांगड्या गड्याच्या भूमिकेत दिसले तेव्हा फडावरची लावणी क्वीन म्हणजेच सुरेखा पुणेकर या घरात दिसणार अशी चर्चा सुरू झाली. आता मांजरेकर किर्तनकाराच्या रुपात दिसत असल्याने घरात नक्की कोण येणार याची उत्सुकता ताणली गेलीय.
महाराष्ट्राला कायम टाळ आणि चाळ या दोन्हीचा नाद असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. आता पायात चाळ बांधून कोण घरात जाणार याचा अंदाज आल्यावर आता टाळ हातात घेऊन नक्की कोण बिग बॉसच्या घरात जातं याची उत्सुकता ताणली गेली आहे.