मुंबई - कोरोनाची साथ पसरल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. असाच मदतीचा हात पुढे करत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला सहकार्य केले आहे.
‘बिग बाजार’चे १५०० रुपयांचे ५०० कूपन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. नुकतेच महामंडळाच्या ५०० सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. या कूपनअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या मदतीबद्दल 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.