मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगन एका तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करताना दिसतो. मात्र, त्याच्या एका ४० वर्षीय कँसरग्रस्त चाहत्याने त्याला अशा जाहीराती न करण्याचा सल्ला दिला आहे. नानकराम असे या चाहत्याचे नाव आहे. या तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याला कन्सरचे निदान झाले आहे.
नानकराम हा अजय देवगनचा खूप मोठा चाहता असल्याचे त्याच्या कुटुंबियानी सांगितले आहे. त्याची जाहिरात पाहून नानकरामने तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास सुरूवात केली होती. मात्र, तंबाखू शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचे या चाहत्याने सांगितले आहे.
नानकराम यांचा मुलगा दिनेश मिना यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले आहे, की 'माझ्या वडिलांनी काही वर्षांपूर्वीच अजय देवगन ज्या ब्रॅन्डची जाहीरात करतो, तेच खाण्यास सुरुवात केली. तेव्हा अजय देवगन यांचा खूप प्रभाव त्यांच्यावर पडला होता. मात्र, अशाप्रकारच्या जाहीराती अजयसारख्या अभिनेत्याने करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. नानकराम यांना दोन मुले आहेत. त्यांचा चहाविक्रीचा व्यवसाय आहे.
अजय देवगन सध्या त्याच्या आगामी 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तब्बु आणि रकुल प्रित सिंग या अभिनेत्री झळकणार आहेत. लव्ह रंजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अकिव नेनी हे निर्मिती करत आहेत.