चैन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. आज चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी केली. तसेच त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. रजनीकांत याचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटात अभिनय केला आहे.
रजनीकांत ह्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा समाजाच्या कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड रजनीकांत असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे. चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला अभिनय शिकण्याकरता गेले. मद्रास फिल्म इंस्टीट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द 1974-75 मध्ये सुरू केली.
सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार -
'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनीज बुकमध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपानमध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपानमध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
राजकारणात प्रवेश -
रजनीकांत आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात ते करणार आहेत. त्यांच्याकडे तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही.
हेही वाचा - थलैवाची राजकारणात एंट्री; 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा