अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिध्दार्थ चोप्रा आणि इशिता कुमार यांचे ठरलेले लग्न मोडले आहे. दोन्ही कुटुंबीय आणि वधू, वर यांच्या संमतीने विवाह रद्द करण्याचा निर्णय झालाय. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी या गोष्टीला दुजोरा दिलाय. सिध्दार्थ या विवाहाला तयार नव्हता असेही त्यांनी म्हटलंय.
गेल्या आठवड्यात इशिता आणि सिध्दार्थ यांचे लग्न होणार होते. यासाठी प्रियंकादेखील भारतात पतीसह आली होती. मात्र इशिता रुग्णालयात उपचार घेत असल्याचे कारण देत हे लग्न होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. यावरुन बरीच चर्चा सुरू झाली. अखेर इशिता आणि सिध्दार्थ यांनाच लग्न करायचे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान इशिताचा फेब्रुवारी महिन्यात रोका हा विवाहाचा पारंपरिक विधी पार पडला होता. त्याचे फोटो बरेच चर्चेत होते आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. ते फोटो इशिताने डिलीट केले आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'नवी सुरुवात' आणि 'सुंदर अंत'.
दरम्यान प्रियंका चोप्राचा फिल्म 'द स्काई इज पिंक' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर आणि झाहिरा वसीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सिध्दार्ख कपूर, सोनाली बोस यांच्या सहकार्याने प्रियंका चोप्रा करीत आहे. प्रियंका आणखीनही काही चित्रपटांची कामे लवकरच सुरू करणार आहे.