मुंबईः अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला मैदान चित्रपट आता पुढच्या वर्षी १३ ऑगस्टला चित्रपटगृहात झळकणार आहे.
भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण काळावर आधारित मैदान हा चित्रपट सुरुवातीला २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन ११ डिसेंबरपर्यंत ढकलले होते. अजय देवगणने शनिवारी ट्विटरवर चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. १३ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे आणि तो मान्सूननंतरही सुरू राहण्याची शक्यता आहे.
मैदान चित्रपटामध्ये अजय देवगण सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारणार आहे. सय्यद यांनी १९५० पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९६३ पर्यंत भारतीय फुटब़ल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम केले होते. बधाई हो या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रविंदर नाथ शर्मा यांनी मैदानच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सैय्यन क्वाड्रोस यांनी पटकथा लिहिली आहे, तर रितेश शहा यांनी संवाद लिहिले आहेत. प्रियामणि, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्या मुख्य भूमिका असलेल्या, मैदान चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि बोनी कपूर करीत आहेत.
हेही वाचा -गलवान व्हॅलीच्या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार अजय देवगण
अजय देवगणने आपल्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आता डिस्ने + हॉटस्टार या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर थेट रिलीज केला जाईल.