वेलिंग्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी जाहीर केले की त्या पुढील महिन्यात पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील. न्यूझीलंडच्या एका प्रसारकाने यासंबंधी ट्विट केले आहे. जेसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, त्या या वर्षी पुन्हा निवडणूक लढणार नाहीत. 7 फेब्रुवारी हा पंतप्रधान म्हणून त्यांचा अखेरचा दिवस असेल. न्यूझीलंडची 2023 ची सार्वत्रिक निवडणूक 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. साडेपाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आर्डर्न यांनी अचानकच हा निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात जॅसिंडा यांनी ज्या प्रकारे देशाची परिस्थिती हाताळली होती त्याचे संपूर्ण जगात कौतूक झाले होते.
पंतप्रधान पदासाठी माझे सर्व काही दिले : जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, 'मी पंतप्रधान होण्यासाठी सर्व काही दिले आहे. तसेच माझ्याकडून खूप काही हिरावले देखील गेले आहे. त्या म्हणाल्या की, तुमच्याकडे पूर्ण ताकद असल्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही आणि अपरिहार्यपणे येणार्या अनियोजित आणि अनपेक्षित आव्हानांसाठी थोडी ताकद राखून ठेवावी लागते. मला माहित आहे की माझ्या कामाला न्याय देण्यासाठी माझ्याकडे आता थोडीसाही ताकद राखीव नाही. हे इतके सोपे आहे'.
मुलगी आणि साथिदाराला उद्देशून संदेश : प्रसारमाध्यमांशी बोलताना आर्डर्न म्हणाल्या की, मला राजीनामा का द्यायचा आहे याचे कोणतेही विशेष कारण नाही. कदाचित मी 'माणूस' आहे म्हणून. त्या म्हणाल्या की मला हे नेव्हसाठी (त्यांची मुलगी) करायचे आहे. त्यांनी नेव्हला उद्देशून लिहिले की, पुढच्या वर्षी जेव्हा तू शाळेत जायला लागेल तेव्हा तुझी आई तुझी घरी परत येण्याची वाट पाहत असेल. त्यांनी आपल्या पार्टनर क्लार्क उद्देशून म्हटले की, 'चल, आता शेवटी आपण लग्न करूया. आर्डर्न यांनी टेलिव्हिजनवरील पत्रकार परिषदेत सांगितले की, ही साडेपाच वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी वर्षे होती.
जगातील सर्वात तरुण महिला नेत्यांपैकी एक : जॅसिंडा आर्डर्न 2017 मध्ये जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा त्या केवळ 37 वर्षांच्या होत्या. आर्डर्न या जगातील सर्वात तरुण महिला नेत्यांपैकी एक आहेत. तसेच पदावर असताना बाळाला जन्म देणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. मार्च 2019 मध्ये, आर्डर्नला न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एकाचा सामना करावा लागला. एका श्वेत वर्चस्ववादी बंदूकधाऱ्याने क्राइस्टचर्चमधील दोन मशिदींवर हल्ला केला आणि 51 लोकांची हत्या केली होती. त्यानंतर वाचलेल्यांना आणि न्यूझीलंडच्या मुस्लिम समुदायाला तिने ज्या प्रकारे हाताळले त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक झाले.
हेही वाचा : Pakistan Crisis : आर्थिक हलाखीमुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात, श्रीलंकेसारखी परिस्थिती होणार?