काबुल : अमेरिका-तालिबान शांतता कराराचा एक भाग म्हणून, अफगाणिस्तान सरकार ४०० तालिबानींना मुक्त करणार होते. त्यांपैकी ८० कैद्यांना आज सोडण्यात आले. अफगाण सरकारने याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जावेद फैजल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. दरम्यान, अफगाण सरकारने ८० कैद्यांना सोडल्याची मािती दिली असताना, काही तालिबानी प्रवक्त्यांनी मात्र ८६ कैद्यांच्या मुक्ततेचा दावा केला आहे. तसेच, इतर कैद्यांना कधी सोडण्यात येईल याबाबत अफगाण सरकारने कोणतीही माहिती दिली नाही.
फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांतता करारानुसार, अफगाण सरकार हे ५ हजार तालिबानी कैद्यांना मुक्त करणार आहे. ज्या बदल्यात तालिबान अफगाणिस्तानच्या १ हजार सैनिकांना मुक्त करेल. यासोबतच, या करारानुसार पुढील वर्षीच्या जुलैमध्ये तेव्हाची परिस्थिती पाहून अमेरिकेचे सैन्यही अफगाणिस्तानमधून हटवण्यात येणार आहे.
दरम्यान, कतारमध्ये असलेल्या तालिबानच्या कार्यालयामध्ये अफगाण-तालिबान शांतता चर्चांना पुन्हा सुरूवात होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. २० ऑगस्टपासून या चर्चा सुरू होतील, असे काही अफगाण नेत्यांनी सांगितले.