जिनिव्हा : जगभरात सध्या खोट्या कोरोना लसींची ऑनलाईन विक्री सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारची खरेदी करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन स्वित्झर्लँडच्या आरोग्य नियामक मंडळाने (स्विसमेडिक) केले आहे. अशा प्रकारच्या खोट्या औषधांमुळे केवळ आर्थिक फसवणूकच होत नाही, तर आरोग्यासही धोका निर्माण होतो, असे स्विसमेडिकने म्हटले आहे.
इंटरनेटवर अनेक लसी उपलब्ध..
सध्या इंटरनेटवर बऱ्याच खोट्या लसी उपलब्ध आहेत. विशेषतः कोरोनावरील खोट्या लसींचा सुळसुळाट झाला आहे. कित्येक वेळा ग्राहकांना देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये घातक असे पदार्थही मिसळलेले असतात. तर, कित्येक वेळा ऑनलाईन किंमत वसूल करुन, पुढे ग्राहकांना काहीच देण्यात येत नाही, असे स्विसमेडिकने स्पष्ट केले.
लसीची ऑनलाईन विक्री शक्य नाही..
स्विसमेडिकने सांगितले आहे, की कोरनावरील लसी या इंजेक्शनने द्याव्या लागतात. तसेच त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोल्ड चेनच्या माध्यमातून न्यावे लागते, त्यामुळे त्यांची ऑनलाईन विक्री शक्य नाही. ज्यांना लस हवी आहे, त्यांनी नजीकच्या रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रामध्ये जाऊन त्याबाबत विचारणा करावी असेही स्विसमेडिकने म्हटले आहे.
दरम्यान, जगातील काही देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. तसेच, जगभरात सध्या २३६ कोरोना लसी तयार होत असून, त्यांपैकी ६३ लसींची चाचणी सुरू आहे.
हेही वाचा : दक्षिण कोरिया करणार मोफत कोरोना लसीकरण; राष्ट्राध्यक्षांची घोषणा